Aaroh velankar family feud



‘रेगे’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळवत आजच्या आघाडीच्या तरुण अभिनेत्यांच्या यादीत गणला जाणारा अभिनेता म्हणजे आरोह वेलणकर. त्याच्या पत्नीचं नाव आहे अंकिता. अंकिता आणि आरोह हे दोघंही पेशानं इंजिनिअर आहेत. पुढं आरोहनं मनोरंजन क्षेत्राची निवड केली आणि अंकिता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करते.

आरोह आणि अंकिता यांची ओळख झाली ती १२ वर्षांपूर्वी पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करताना. कॉलेजच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये हे दोघंही एकत्र होते. त्यात आरोह अभिनय करायचा, तर अंकिता नृत्यात भाग घ्यायची आणि त्यासोबतच ती कोरिओग्राफीही करायची. कलेबद्दल असलेल्या याच आवडीमुळं त्यांच्यातली मैत्री हळूहळू आणखीन खुलत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

त्यांचं लग्न होऊन आता तीन वर्षं झाली. पण लग्नानंतर अंकिता ही सुनेपेक्षा वेलणकरांची लाडाची लेक झाली आहे.

आरोह म्हणाला, ‘‘अंकिता स्वभावानं अत्यंत चांगली मुलगी आहे. ती खूप हसतमुख असते, ती गप्पिष्ट आहे. तिचा स्वभाव खूपच मनमिळाऊ आहे. तिच्या या स्वभावानं तिनं माझ्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला पटकन आपलंस केलं आहे. ती सर्वांना सांभाळून घेते. कोणत्याही गोष्टीचा सखोल आणि सर्व बाजूनं विचार करते.

तिचं मल्टिटास्किंग आणि प्रामाणिकपणा मला आत्मसात करायला नक्कीच आवडेल. गंमत म्हणजे, अंकिताला भेटण्यापूर्वी मला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणं, खरेदी करणं या तितक्या आवडायच्या नाहीत. पण अंकितामुळं मला ते करणं आवडू लागलं. आम्ही नवरा बायको जरी असलो तरी आमच्यातलं नातं मैत्रीचंच आहे. लग्नानंतर आमच्या दोघांच्याही स्वभावात काही बदल झालेला नाही.

लग्नापूर्वी आम्ही एकमेकांशी जसे वागायचो, एकमेकांची थट्टा मस्करी करायचो तितकीच आजही करतो. तिच्यात नसलेल्या गुणांना मी भरून काढतो; माझ्यात नसलेल्या गुणांना ती भरून काढते. अशाप्रकारे आम्ही एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतो असं मला वाटतं.’’

आरोहबद्दलही अंकिता भरभरून बोलली. तिनं सांगितलं, ‘‘आरोह हा उत्तम अभिनेता आहे.

त्याची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे. तो खूप क्रिएटिव्ह आहे. असा बहुगुणी मुलगा असूनही तो प्रचंड ‘डाऊन टू अर्थ’ आहे. तो मला छान सांभाळून घेतो. मी कधी चिडले असले, तरी तो शांतपणे मला समजावतो. तो जितका शांत स्वभावाचा आहे, तितकाच तो खोडकरही आहे. तो एखाद्या व्यक्तीला भरपूर त्रास देऊ शकतो. त्याच्या या स्वभावामुळं व त्याच्या संगतीत राहून माझ्यातलाही पेशन्स खूप वाढला आहे.

आम्ही कामाच्या बाबतीत कायमच एकमेकांना एकमेकांची स्पेस देत आलो आहोत. आम्ही कधीही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. त्यामुळं आम्ही दोघंही आपापली कामं आणखीन छान प्रकारे करत आलो आहोत. त्याने ‘रेगे’ या चित्रपटात साकारलेली भूमिका मला विशेष आवडली. पण त्यासोबतच त्याचा अभिनय हा रंगमंचावर आणखी छान खुलतो असं मला वाटतं. कॉलेजमध्ये असताना आम्ही पुरषोत्तम करंडकला ‘४०४ पेज नॉट फाउंड’ ही एकांकिका केली होती; त्यात आरोहनं अप्रतिम काम केलं होतं.

आरोह खूप प्रामाणिक मुलगा आहे. तो कायम सगळ्यांना त्याला शक्य होईल तितकी मदत करत आला आहे. तो काळ वेळ न बघता समोरच्याची मदत करायला धावून जातो. आरोहमधला हा गुण मला विशेष आवडतो आणि तो मला आत्मसात करायला खूप आवडेल.’’

कोरोना रुग्णांसाठी काम...

सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं सर्व यंत्रणांवर ताण आला आहे. अनेक सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

अशात अनेक नागरिक आपणहून कोरोना रुग्णांना मदतीचा हात देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरोहनंही पुण्यातील काही सामाजिक संस्थांच्या साहाय्यानं कोरोना रुग्णांची मदत करण्याच्या कामात स्वतःला वाहून घेतलं आहे. रुग्णांना बेड्स, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, व्हेंटिलेटर, ब्लड, प्लाझ्मा उपलब्ध करून देणं, अशी महत्त्वाची कामं आरोह करत आहे.

‘‘आजच्या घडीला प्लाझ्मा डोनर्सची नितांत आवश्यकता असल्याने प्लाझ्मा दान करावा,’’ असं आवाहनही आरोहनं केलं. आरोह करत असलेल्या या कामाचा अंकिताला आणि आरोहच्या घरच्यांना खूप अभिमान आहे. अशाप्रकारे ऑनस्क्रीन हिरो असलेला आरोह ऑफ स्क्रीनही हिरोची भूमिका बजावत आहे.

(शब्दांकन - राजसी वैद्य)